पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसापूर्वी डेंग्यू आजार झाला होता. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. मात्र आजारपणातून बरं होताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत. ते सध्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी पुण्यात आहेत. (Ajit Pawar)
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दिवाळीआधी मला डेंग्यू झाला होता. पण, तो राजकीय नव्हता माध्यमांनी राजकीय आजार झाल्याचं वृत्त चालवलं. याचं वाईट वाटलं. तसेच, अमित शहा यांच्याकडे कोणाचाही तक्रार करण्यासाठी गेलो नव्हतो असंही अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, दिवाळीआधी डेंग्यू झाल्याने १५ दिवस आजारी होतो. पण, वृत्तपत्रे आणि माध्यमांमध्ये राजकीय आजार झाल्याचं सांगितलं गेलं होत. याचं मला वाईट वाटलं. मी लेचापेचा माणूस नाही. गेली ३२ वर्षे माझी मते मी स्पष्ट मांडतोय. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. तसेच, तक्रार करण्यासाठी अमित शाहांची भेट घेतल्याचं बोललं गेलं. मात्र, तक्रार करणं माझ्या स्वभावात नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम करत असतो. तीच पद्धत पुढं चालवली गेली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.(Dengue)
दरम्यान डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचं सांगणारे अजित पवार यांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. पण, तक्रार करण्यासाठी अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतल्याची टीका विरोधकांनी केली. यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं.
लोकसभा निवडणुकीवर अजितदादांच मोठं विधान
लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करा. पुढे आता लोकसभा निवडणूका लागतील. आचारसंहिता लागेल तेव्हा कामं मंदावतील. परत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या तडाख्यात निधी देता येणार नाही. त्यामुळे आज मी वेळ काढून काम पाहायला आलो आहे. लवकरात लवकर ही कामं पूर्ण करा, अशा सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.(Lok Sabha Election)