भोर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. काही ठिकाणी शाळेच्या वर्गखोल्यांना दारे, खिडक्याच नाहीत, तर काही ठिकाणी छताचीही दुरवस्था झाल्याने शाळा गळत आहेत. अशा शाळांची संख्या ११ असल्याचे समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी शाळांच्या भिंती पडलेल्या आहेत.
तसेच संरक्षक भिंतीही नाहीत, रंगरंगोटी नाही, शौचालये नाहीत, अशा शाळांची संख्या ४२ एवढी आहेत. या वस्तुस्थितीमुळे विद्यार्थ्यांना धोकादायक स्थितीत जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. काळजाच्या तुकड्याला पडक्या शाळेत कसं पाठवू? असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
मात्र, भोर तालुक्यातील २७४ प्राथमिक शाळांपैकी १३ गावांतील २६ शाळा मोडकळीला आल्या आहेत. त्यातील १६ शाळा पाडून त्याठिकाणी ११ नवीन शाळा बांधाव्या लागणार आहेत. तसेच पत्रे खराब, अँगल बदलणे, फरशी बदलणे, रंगकाम करणे, शौचालये बांधणे अशा २७ गावांतील ४२ शाळांची दुरुस्ती करावी लागणार आहे.
अशा एकूण ५२ शाळा आहेत. या शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. १३९ प्राथमिक शाळेतील शौचालये काही खराब आहेत तर काही वापरण्यायोग्य नाहीत, त्यामुळे मुलांना काही ठिकाणी बाहेर जावे लागत असल्याचे चित्र आहे. या पडक्या आणि धोकादायक शाळेत काळजाच्या तुकड्याला कसं पाठवू? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बहुतांश प्राथमिक शाळा पत्र्याच्या आहेत. त्यामुळे शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करता येत नाही. मात्र, सिमेट काँक्रीटच्या (आरसीसी) असलेल्या नाटंबी शाळेचे आॅडीट करण्यात आले असून, सदरची शाळा धोकादायक असल्यामुळे मगीला दोन वर्षांपासून वर्गखोल्या बंद करण्यात आल्या आहेत.
धोकादायक असलेल्या ठिकाणी नविन शाळा खोल्या बांधकामाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात आल्याचे भोर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षण अभियानाअंर्तगत जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद फंड आणि १५ व्या वित्त आयोगामधुन ५० ठिकाणी नवीन शाळा बांधकामासाठी ६ कोटी २५ लाख तर खोल्याचे ३९ ठिकाणी शाळा दुरुस्तीसाठी १ कोटी ७८ लाख २५ हजार असे एकूण ८ कोटी २५ लाख रुपयांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
भोर-आंबवडे रस्त्यावरील नाटंबी (ता. भोर) येथे पहिली ते पाचवीपर्यंत १४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गावातील वर्गखोल्या धोकादायक असल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून मुलांना अस्मिता भवनात शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे मुलांना अनेक असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. भोर तालुक्यात धोकादायक व नादुरुस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांचा शिक्षण विभागातील बांधकाम विभागाकडून सर्व्हे करण्यात आला आहे.
नाटंबी गावातील शाळाखोल्या मागील तीन ते चार वर्षांपासून धोकादायक आहेत. त्यामुळे मुले वर्गात बसत नाहीत. दुसरी वर्गखोली नसल्याने मुलांना अस्मिता भवनात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेला वारंवार शाळेची मागणी करूनही नवीन इमारत मिळत नसल्याचे खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक शिवाजी नाटंबे यांनी सांगितले.
नव्या शाळा व शाळा दुरुस्तीसाठी ८ कोटींची गरज
भोर तालुक्यात २७४ प्राथमिक शाळा असून, त्यातील ५० ठिकाणी नविन शाळा बांधकामासाठी ६ कोटी २५ लाख तर ३९ ठिकाणी शाळा दुरुस्तीसाठी १ कोटी ७८ लाख रुपये निधी अशा एकूण ८ कोटी २५ लाख रुपये निधीची मागणी जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद फंड व १५ वा वित्त आयोग यांच्याकडे करण्यात आली आहे.
मात्र, निधीअभावी मगिल दोन-तीन वर्षांपासून काम झालेले नाही. त्यामुळे शाळांची दुरवस्था झाली आहे. तर तालुक्यात १३९ ठिकाणी शौचालये व स्वच्छतागृहे कमी-अधिक प्रमाणात खराब तर काही ठिकाणी अत्यंत खराब आहेत. यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. त्यासाठी अधिक निधीची आवश्यकता आहे.
संबंधित शाळांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले आहे. लवकरच निधी उपलब्ध होईल, त्यानंतर धोकादायक ठिकाणी नवीन शाळा तर नादुरुस्त ठिकाणी शाळांची दुरुस्ती केली जाईल.
– किरणकुमार धनवाडे, गटविकास अधिकारी, भोर