तिरुअनंतपुरम: सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आणि तामिळनाडूच्या माजी राज्यपाल माजी न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे गुरुवारी केरळमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी न्यायमूर्ती फातिमा बीवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आणि तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून आपली छाप सोडली.
जॉर्ज यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘त्या एक धाडसी महिला होत्या, ज्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. त्यांचे असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले की प्रबळ इच्छाशक्ती आणि हेतू समजून घेऊन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत, दिवंगत न्यायमूर्ती बीवी यांनी देशभरातील महिलांसाठी आदर्श आणि आयकॉन म्हणून काम केले आणि आपली छाप सोडली. असंही त्या म्हणाल्या.
कोण होत्या फातिमा बिवी?
दिवंगत न्यायमूर्ती फातिमा बिवी यांनी केरळमध्ये वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि 1974 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम सुरु केले. 1980 मध्ये त्या आयकर अपील न्यायाधिकरणात रुजू झाल्या. 1983 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. केरळमधील पांडलम येथील असलेल्या न्यायमूर्ती बीवी यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली. त्यांचे शालेय शिक्षण पथनामथिट्टा येथील कॅथोलिक हायस्कूलमध्ये पूर्ण केले.