पुणे : शनिवार, रविवार आला की अनेकांचा फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. पण नेमकं फिरावं कुठं हाच प्रश्न पडतो. मात्र, जर तुम्ही पुण्यात (pune) फिरायला येण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आम्ही तुम्हाला पुण्यातील प्रसिद्ध अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत.
पुण्यात तसे अनेक पर्यटनस्थळं आहेत. त्यात शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस, ओशो आश्रम, लाल महल या ऐतिहासिक वास्तूंसह इतरही अनेक वास्तू पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती अशा भागात असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणजे शनिवार वाडा. शनिवार वाडा हा केवळ पुणे, महाराष्ट्र, भारतापुरता प्रसिद्ध नाहीतर ही एक जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे.
शनिवार वाडा हा पेशवेकाळात बांधण्यात आला होता. याच ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 मध्ये या जागी लाकडी राजवाडा बांधला होता. मात्र, इंग्रजांनी हा वाडा नष्ट केला. आता केवळ वाद्याचा पाया येथे शिल्लक आहे. तसेच गांधी मेमोरिअल सोसायटीचा आगाखान पॅलेस. हा पॅलेस खास इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झालेल्या महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई यांच्यासाठी तुरूंग म्हणून करण्यात आला होता.
याशिवाय, लाल महल पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूमध्ये गेले होते. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्य हिसकावू पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात छाटली होती.