पुणे : देशभरात आज भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे भाऊबीजेसाठी अजित पवारांच्या काटेवाडीत दाखल झाल्या आहेत. पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने गंज पेठेतील अग्निशामक विभागाच्या मुख्य कार्यालयात भाऊबीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळून भाऊबीज साजरी करीत दोन्ही नेत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला भाजपचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, आयोजक मिलिंद भोई यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. या वेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आज या कार्यक्रमा दरम्यान भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळले. माझे बंधू जयंत पाटील यांना डेंग्यू झाला आहे. ते लवकर बरे होतील. मला जयंत पाटील यांनी फोन करून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.
मागील १६ वर्षांपासून अग्निशामक विभागाच्या भाऊबीज कार्यक्रमाला येते. त्या निमित्ताने सर्वांसोबत संवाद साधणे शक्य होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात काम करण्यास एक ऊर्जा मिळते, असेही चाकणकर यांनी सांगितले.