अहमदनगर : दिवाळी सण आणि गावची यात्रा या दोनच सणाला गावापासून दूर शहरात वसलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचा योग येतो. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. असे असताना गावी जाण्यासाठी तिकीट बुकिंग, बॅगा भरणे, खरेदी अशी तयारी सर्वांनीच सुरु केली आहे. पण तुम्ही दिवाळीसाठी गावी जाल आणि इकडे तुमच्या घरात चोरटे दिवाळी साजरी करतील, असे व्हायला नको. यासाठी विशेष खबरदारी घेऊनच घराबाहेर पडा.
गावाला किंवा बाहेर कुठं जाताना घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. तसेच घरांना मजबूत दरवाजे, कुलूप आणि सेफ्टी यंत्रणा बसवा, मौल्यवान दागिने रोख रक्कम बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागू देऊ नका. म्हणून खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
स्टेटस ठेवणे येऊ शकते अंगलट
अनेकांना दिवाळी सणासाठी अथवा अन्य प्रसंगी गावी जाताना सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे, स्टोरी बनवणे अशी सवय असते. पण ही सवय तुमच्या अंगलट येऊ शकते. अनेक चोरटे सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असतात. तुमचे स्टेटस पाहून तुमच्या घरात कोणी नाही याची त्यांना खात्री होते. यामुळे तुमच्या घरी चोरी होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर स्टेटस ठेवताना, स्टोरी बनवताना काळजी घ्या.
मौल्यवान वस्तू, दागिने घरात ठेवणे टाळा
मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. गावी जाताना मौल्यवान वस्तू, दागिने तसेच पैसे घरात ठेवणे टाळा. मौल्यवान वस्तू, पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. घराला चांगल्या प्रतीचे कुलूप, दरवाजे बसवा. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवा. अनेक घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेतात. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद होऊनही उपयोग होत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा.
संशयितांची पोलिसांना माहिती द्या
घर, सोसायटीच्या परिसरात संशयित हालचाली दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अनेक घटनांमध्ये चोरटे सुरुवातीला घरांची, परिसराची रेकी करतात आणि संधी साधून घरफोडी, चोरी करतात. त्यामुळे संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना दिल्यास हा धोका टाळता येईल.
सुरक्षा रक्षकांचे व्हेरिफिकेशन करा
घर, सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक ठेवा. सुरक्षा रक्षकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या. घर, सोसायटीच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा उजेड राहील, याचीही दक्षता घ्या. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे त्यांचे काम करतात. त्यांना ही संधी देऊ नका. घराला कुलूप लावून गावी गेल्यानंतर आठवडा, दोन आठवड्याने घरी येणार असाल तर सोसायटीमध्ये शेजारी ज्या घरात लोक असणार आहेत, त्यांना फोन करून चौकशी करा.
प्रवासात साहित्यांची घ्या काळजी
गावी जाताना, प्रवास करताना तुमच्या मौल्यवान वस्तू, दागिन्यांची काळजी घ्या. प्रवासात देखील अनेक ठग, चोरटे तुमचा पाठलाग करण्याची शक्यता असते. बोलण्यात गुंतवून अथवा काहीतरी कारणाने तुमचे साहित्य लंपास होऊ शकते. त्यामुळे प्रवासात साहित्याची काळजी घ्या.