ठाणे: कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंब्र्यातील शाखेत न जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे हे शाखेच्या बॅरिकेट्सपर्यंत पर्यंत गेले. पोलिसांच्या आवाहनानंतर ते परत माघारी फिरले. त्यानंतर ही शाखा परत मिळवणारच असा निश्चय उद्धव ठाकरे गटाने केला.
एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाखेपर्यंत न जाण्याचं आवाहन केलं. त्यानंतरही ठाकरे स्वतः बॅरिकेट्सपाशी पोहोचले. पोलिसांनी त्यांना पुन्हा केलेल्या आवाहनांतर उद्धव ठाकरे पुन्हा गाडीत बसले आणि त्यांचा ताफा वळला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंब्र्याच्या शाखेला भेट देण्यास निघाल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्यावर पुष्पवर्षाव केला. त्यानंतर बाईकने कार्यकर्ते त्यांच्या मुंब्र्याकडे रवाना झाले. मुंब्र्यामध्ये पोहोचल्यावर त्यांचा ताफा अडवण्यात आल्याची तक्रार उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
मुंब्र्यातील शाखेचा नेमका वाद काय?
मुंब्रा येथे शिवसेनेची शाखा होती. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली. यानंतर शाखा-शाखांवर दोन्ही गटांकडून दावा सांगितलं जात आहे. त्याप्रमणे मुंब्र्यातील शाखेवर दोन्ही गटांनी दावा केला. 2 नोव्हेंबरला ठाण्याच्या मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवल्याचा आरोप होत आहे.
पूर्वीची शाखा जमीनदोस्त केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने त्याच ठिकाणी कंटेनर शाखा बसवली आहे. ही शाखा तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता.