गणेश सुळ
केडगाव(पुणे) : मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्याला दिवाळीनंतर पुन्हा सुरूवात होत आहे. 16 नोव्हेंबरला ते दौंड तालुक्यातील वरवंड येथे येणार असून तेथील बाजार मैदान परिसरात सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. दौंड सकल मराठा समाज यांनी याबाबत माहिती दिली. दौंड शहरातील मोठी बाजारपेठ असलेले वरवंड येथे ही सभा होणार असल्याने त्या परिसराची पाहणी पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव व पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी केली.
यावेळी त्यांनी आयोजक व स्थानिक पदाधिकारी याच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर जरांगे-पाटील तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. यापूर्वी देखील सकल मराठा समाज दौंड याच्या वतीने शहरात विविध सभा, आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता दौंड तालुक्यांत जरांगे पाटील येत असून त्यांची सभा होणार असल्यामुळे याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
या सभेवेळी ए. सी.दिवेकर महाविद्यालय, गोपीनाथ विद्यालय, विठ्ठल मंदिर, तलाव परिसर,बजाज शोरुम, नागनाथ विद्यालय, जि. प. शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार्किग व्यवस्था केली जाणार असल्याची माहित सकल मराठा समाज यांच्याकडून देण्यात आली