पुणे : पुण्यातील देवाच्या आळंदी येथील इंद्रायणी नदीत पुन्हा एकदा साबणासारखा फेस वाहत आहे. वारकरी सांप्रदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदीतील इंद्रायणी नदीत साबणासारखा फेस वाहणं हे आता नित्याचंच झालं आहे. संपूर्ण वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानली जाणारी इंद्रायणी नदी अक्षरशः फेसाळली आहे. आळंदीतील लाखो वारकरी आणि स्थानिकांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकाराला नेमकं कोण जबाबदार आहे, असा प्रश्न आता नागरिंकाकडून विचारला जात आहे.(Indrayani River)
यामुळे इंद्रायणीची होतेय दुर्दशा
पिंपरी चिंचवड शहरामध्ये विनापरवाना चालणाऱ्या शेकडो कंपन्या आहेत. याच कंपन्यांचं रसायनयुक्त पाणी इंद्रायणीच्या नदी पात्रात सोडले जाते, यामुळे या पापाचे धनी हे विनापरवाना चालणाऱ्या कंपन्याच आहेत असा सूर स्थानिकांमध्ये निघत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.(Indrayani River)
कार्तिकी एकादशीला लाखो भाविक नदीत स्नान करतात
राज्यभरातून लाखो भाविक आषाढी वारी, कार्तिकी एकादशीला आळंदीनगरीत दाखल होतात. दरम्यान ते याच इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करून तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पीत असतात. मात्र, आता लाखो भाविक तसेच स्थानिक नागरिक या रसायनयुक्त पाण्यामुळे आजारी पडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा इंद्रायणी नदीत असा साबणासारखा फेस येण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सतत तक्रारी करूनही यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
राजकीय नेत्यांना फक्त एकादशीलाच इंद्रायणीची आठवण
राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अन् उद्योग मंत्री यांना ही केवळ आषाढी वारी, कार्तिकी एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्यावेळीच इंद्रायणीची आठवण येते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. इतक्या गंभीर विषयाची जबाबदारी घ्यायला कोणचं तयार नसल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे. राज्य सरकार केवळ आश्वासनं देण्यावर भर देत आहे. राज्यातील तसेच देशभरातील लाखो वारकाऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीबाबतचा हा गंभीर प्रश्न कधी दूर होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.