योगेश पडवळ
पाबळ : कवठे येमाई ( ता. शिरूर ) येखील काळूबाई नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी किल्ला बनवण्याची लगबग सुरु झालेली आहे. लाल माती, दगड, विटांच्या सहाय्याने किल्ला तयार करायचा. भगवा ध्वज आणि सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बालेकिल्ल्यावर विराजमान करुन प्रवेशद्वारापासून भालदार चोपदार, सनई चौघडेवाले, घोडेस्वार, सेनापती, मावळ्यांच्या प्रतीकृती उभ्या करायच्या. चिमुकल्यामधील धर्माभिमानी, अभ्यासू, चौकस, नाविन्यपूर्ण कलाकारी वृत्तीचे दर्शन सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात होऊ लागले आहे. दिवाळीची सुट्टी लागली की चिमुकले किल्ले बनविण्यात मग्न झालेले पाहायला मिळत आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहे. दिवाळीच्या खरेदीत चित्रे आणि किल्ला बनवण्याचे इतर साहीत्य देखील महत्त्वाचा घटक बनलेला दिसतोय. दिवाळी हा हिंदू धर्म संस्कृतीतला सर्वांत मोठा आनंदाचा सण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौऱ्याची आणि त्यागाची दिवाळीतही आम्हाला आठवण राहावी, या उद्देशाने घरासमोर किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.
गावागावातील चाळी, वाडे आणि हवेल्या सिमेंटच्या जंगलात बदलून माणुसकी कुंपणात बंदिस्त झाली आहे. असे असले तरी बालगोपाळांकडून घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चालू असलेल्या लगबगीने दिवाळीची चाहूल लागते. आधुनिकतेच्या जमान्यातही किल्ला बनविण्याची क्रेझ नव्या पिढीत वाढत असल्याने मावळे, प्राणी, पक्षी शिवाजी महाराजांचे सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवरायांच्या मूर्ती अर्थात चित्रांच्या खरेदीसाठी कुंभारवाडयापासून बाजारपेठेपर्यंत चिमुकल्यांनी गर्दी केली आहे.
मुलांना दिवाळीची सुट्टी लागली की सणाच्या मुख्य खरेदीपेक्षाही किल्ला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव आणि खरेदी करताना थोरामोठ्यांतही बालपण जागे होताना दिसते. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्यानंतर कवठे येमाई सारख्या छोटया भागात लहान मुलांना खेळणे आणि खाऊ पेक्षा किल्ले तयार करण्याची भारीच हौस दिसून येते आहे.
साधारणतः दसऱ्यानंतर लाल माती गोळा करुन विटा दगडांचे डोंगर साकारले जातात. हिरवळीसाठी डोंगरावर हाळीव उगवून दिवाळी जवळ येताच डोंगरावर चिखलाचे पायऱ्या बुरुज आणि प्रवेशद्वार बांधून किल्ला साकारण्यात चिमुकले शिलेदार सध्या दंग झालेले दिसत आहेत. डोंगर, किल्ला बांधून झाल्यावर काऊ-चुना आणि रांगरंगोटीद्वारे त्याला मूर्त स्वरूप दिले जाते.
शेवटी भगवा ध्वज आणि सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बालेकिल्ल्यावर विराजमान करुन प्रवेशद्वारापासून भालदार चोपदार, सनई चौघडेवाले, घोडेस्वार, सेनापती, मावळे दिमतीला हजर केले जातात. अगदी तनमन धन लावून एकचित्ताने बनविलेला किल्ला सर्वांना दाखविण्यासाठी तयार झाले आहे. किल्ले बनवण्याची परंपरा कायम राहावी आणि बच्चेमंडळींना प्रोत्साहन देण्याहेतूने विविध संस्थांकडून दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिवाळीचे किल्ले बनवताना वापरलेल्या संकल्पना पाहून साहजिकच बालगोपाळांमधील धर्माभिमानी, अभ्यासू, चौकस,नाविन्यपूर्ण कलाकारी वृत्तीचे दर्शन होते. एकंदरीतच दिवाळीच्या धामधुमीच्या सर्वांच्या पसंतीस पडेल अशी किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात चिमुकल्यांतले आधुनिक हिरोजी इंदुलकर सध्या घरोघरी दृष्टीस पडत आहेत.