Bachchu Kadu मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे गटासह ते भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रायल देण्याचं आश्वासन दिलं म्हणून मी सत्तेत सहभागी झालो. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दिव्यांग मंत्रायलयाचा प्रस्ताव दिला होता. पण त्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. महायुतीबरोबर गेल्याने माझ्या मतदारसंघातील विकास कामं होणार असतील, तर मी तिकडे गेलं पाहिजे, म्हणून मी तिकडे गेलो, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कधीपर्यंत राहणार? असं विचारलं असता बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू. ते मुख्यमंत्री नसतील तर आम्ही त्यांना तसं सांगून टाकू की, तुम्ही मुख्यमंत्री राहा. आम्ही कायम तुमच्याबरोबर राहतो, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू हे ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.