राहुलकुमार अवचट
यवत : दहिटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवनिर्मिती साहित्य स्पर्धा तसेच दीपावलीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी सोप्या पद्धतीने आकाशकंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवले. या कार्यशाळेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. रंगीत कागदापासून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, एकमेकांशी सहकार्याची भावना ठेवणे आदी बाबी कार्यशाळेत साध्य झाल्या. विद्यार्थी आकाशकंदील बनवताना रममाण झाले होते. नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा खेडेकर यांनी विध्यार्थ्यांना आपले पारंपरिक सण व उत्सव यांचे महत्त्व पटावे म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन शाळेत करण्यात येत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना कार्यशाळेचा उद्देश व महत्त्व विशद करताना पर्यावरणाच्या रक्षणाबाबत मार्गदर्शन करून, विविध प्रकारचे सुंदर व आकर्षक आकाशकंदील बनवल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचे कलागुण व पर्यावरणाचे रक्षण, याबाबत खेडेकर यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टिकपासून बनवलेले आकाशकंदील पर्यावरणाला घातक असतात. असे आकाशकंदील विकत न घेता तुम्ही स्वतः बनवलेले पर्यावरणपूर्वक आकाशकंदीलच दीपावलीला वापरावेत, असा संदेश दिला.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, रंगबेरंगी पणत्यांसह विविध साहित्य तयार केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध साहित्याची निवड करून बक्षीस देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक पद्माकर धेंडे, विकास लवांडे, अरविंद पिसाळ, यशवंत शिंदे, प्रमोद थोरात, शिक्षिका गीता थोरात, शिक्षिका जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी शिक्षकांसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.