महेश सूर्यवंशी
दौंड : ऑनलाइन खरेदी आपल्याला सोपी वाटते, म्हणून आपण एका क्लिकवर ती करतोही. मात्र, यात मरण होते ते स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांचे. ऑनलाइन खरेदीवर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. मात्र, विश्वासू खरेदी करायची असेल अन् स्थानिक व्यापाऱ्यांना जगवायचे असेल, तर ही ऑनलाइन खरेदी टाळा. स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य द्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे आकर्षक सवलतींच्या दरात वस्तू उपलब्ध होत असताना व्यापारी महासंघाने स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीचे आवाहन ग्राहकांना केले आहे. विदेशी ऑनलाइन कंपन्यांना नफा मिळवून देण्याऐवजी स्थानिक स्तरावरील ओळखीच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळीचे व नववर्षाचे वारे वाहू लागले की ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे फेस्टिव्हल ऑफर्स सुरू होतात. अगदी ५० ते ७० टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वस्त दरात घरपोच सेवा मिळत असल्यामुळे सर्वच स्तरांतील ग्राहक गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने याकडे वळले आहेत. परंतु, याचा फटका स्थानिक स्तरावरील बाजारपेठांना बसत आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये कापड बाजारातील विशेषत: रेडिमेड कापड विक्रेत्यांचा व्यवसाय पाच ते दहा टक्क्यांनी प्रभावित झाला आहे. याशिवाय, मोठ्या चेन समूहांचे आव्हानदेखील स्थानिक व्यापाऱ्यांना पेलावे लागत आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी याविरुद्ध एकजूटीने लढा देण्याचा विचार सुरू केला आहे. किरकोळ क्षेत्रातील विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांचे आगमनसुद्धा व्यापाऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
आता व्यापाऱ्यांनी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांना विरोध सुरू केला आहे. आजघडीला देशात सुमारे सात कोटी किरकोळ व्यापारी आहेत. यापैकी बहुतांश व्यापारी दैनंदिन गरजेच्या वस्तू विकतात. तर एक मोठा टक्का हा इलेक्ट्रॉनिक आणि कापड क्षेत्राशी संबंधित आहे. या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नवरात्रोत्सव ते नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंतचा आणि तेथून पुढे उन्हाळ्यातील लग्नसराईचा मोसम व्यापारासाठी अनुकूल समजला जातो. पण, ऑनलाइन कंपन्यांमुळे ऐन मोसमातदेखील व्यापाराने गती पकडली नसल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियाद्वारे जनजागृती
विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांकडून खरेदी करून विदेशी कंपन्यांना नफा कमवून देण्याऐवजी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करा, असे मेसेज सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व्हायरल होत आहेत. स्थानिक व्यावसायिक, व्यापारी यांद्वारे जनजागृती करत आहेत.
अडचणीच्या प्रसंगी स्थानिक व्यावसायिकच ग्राहकांच्या कामी येतो. ग्राहकांनी जवळपासच्या बाजारपेठेतूनच खरेदी करायला हवी.
– योगेश मुंडलिक, किराणा दुकानदारसमक्ष बाजारपेठेतून वस्तू खरेदी करताना मालाची गुणवत्ता आणि योग्य भाव करून घेता येतो. जर ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी टाळून स्थानिक व्यवसाय जगवले तरच ऑनलाईन कंपन्यांकडून भविष्यात होणारी ग्राहकांची पिळवणूक थांबणार आहे.
– मिलिंद गिरमकर, मोरया मोबाईल शॉपी