उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या समोर १३ वर्षांपूर्वी बेकायदेशीर जमाव जमवून सामूहिक हिंसाचार करणाऱ्या वळती (ता. हवेली) येथील १४ आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांच्या आदेशानुसार २७ जुलै २०१० रोजी वळती गावातील तडीपार आरोपी प्रवीण उर्फ अप्पा कुंजीर याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई केली होती. तरीही कुंजीर हा तडीपार करून देखील गावात दहशत करत फिरत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.
पोलीस हवालदार गांधीले व चव्हाण हे गावात गेले असता तेथे प्रवीण कुंजीर मिळून आला. परंतु, कुंजीर याने पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने तडीपारी रद्दचे आदेश दिले आहेत, असे सांगितले. यावेळी पोलिसांनी तडीपारी रद्दच्या आदेशाची प्रत मागितली व पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर आरोपी प्रवीण कुंजीर याने त्याच्या गावातील ५० ते ६० लोकांचा जमाव जमवून पोलीस स्टेशनला जाऊन परिसरात बेकायदेशीर गर्दी जमवून पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधिकारी यांच्या नावाने घोषणाबाजी केली होती.
त्यानंतर पोलिसांनी समजावून सांगून देखील सर्व जमाव तिथेच थांबून घोषणाबाजी करत होता. बंडू शिवराम भागवत यांच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध कायद्यान्वये १५ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर तपास पूर्ण करून आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे प्रकरणातील महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला होता. सर्व आरोपींच्या वतीने अॅड. नितीन भालेराव व अॅड. प्रकाश चव्हाण यांनी काम पहिले.
आरोपींनी कुठलाही गुन्हा केला नसून ५० ते ६० आरोपींच्या जमावाने घोषणाबाजी केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. परंतु, पोलिसांना केवळ १५ आरोपींना अटक केली असून, याप्रकरणात आरोपींची ओळख परेड घेण्यात आलेली नसल्याने आरोपीची ओळख पटवता येणार नाही. केवळ प्रवीण कुंजीर याच्याविरुद्ध पोलिसांनी काढलेली तडीपारी उच्च न्यायालयाने रद्द केली.
दरम्यान, सरकारी पक्षातर्फे साक्षीदारांनी आरोपींची नावे त्यांच्या साक्षीमध्ये सांगितली असून, आरोपींनी बेकायदेशीर जमाव केल्याचे सांगण्यात आले होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सर्व आरोपींच्या विरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी एस. जी. बर्डे कोर्टाने दिले अशी माहिती आरोपींचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. सदर कामी अॅड. मयूर चौधरी यांनी मदत केली.