संदीप टूले
केडगाव : ‘ओबीसी का नारा है, सो में से साठ हमारा है’, ‘ओबीसी पर्व, बहुजन सर्व’ अशी घोषणा देत ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाने एकत्रित ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार चौफुला येथे बुधवारी (दि.8) श्रीकृष्ण मंगल कार्यालयात पार पडलेल्या मेळाव्यात करण्यात आला.
या मेळाव्यात आमचा आतापर्यंत कोणाच्याही आरक्षणाला कधीच विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणात कोणी दबाव आणून संविधानाने दिलेले आरक्षण असंविधानिक मार्गाने घुसखोरी करून जर घेत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. तसे झाले तर आगामी काळात सरकारला ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, आमचे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. पण आमच्या हक्काच्या आरक्षणाचे संरक्षण आम्हाला करावे लागणार आहे.
जर आगामी काळात सरसकट कुणबीचे दाखले दिले, तर भविष्यात मूळ ओबीसी समाजाचा साधा शिपाई सुधा होणार नाही आणि कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारीही दिसणार नाहीत, अशी भीती यावेळी पांडुरंग मेरगळ व्यक्त केली.
सरसकट कुणबी दाखल्यामुळे ओबीसींचे आरक्षण शून्यावर
पश्चिम महाराष्ट्रात तर एकही कुणबी नाही. खोटे पुरावे गोळा करून आणि खोटे कुणबी दाखले घेऊन ओबीसींच्या ताटातले आरक्षण लाटण्याचे काम सध्या चालू आहे. सरसकट कुणबी दाखल्यामुळे ओबीसींचे आरक्षण शून्यावर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले ओबीसींच्या हक्काचे आरक्षण टिकवण्यासाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे विचार महेश भागवत यांनी मांडले.
पुढील पाच वर्षात ज्या-ज्या आगामी निवडणुका होतील त्या निवडणुकीत फक्त ओबीसी एसटी आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवाराशिवाय इतर कोणालाही मतदान न करण्याची शपथ घेणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
दिवाळीनंतर भव्य बहुजनांचा मोर्चाचे आयोजन
दिवाळीनंतर ५० हजारांच्या आसपास भव्य बहुजनांचा मोर्चा दौंड तहसीलदार आणि प्रांत कार्यालयवर काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. याप्रसंगी महेश भागवत, दौलत ठोंबरे, यशवंत शिंदे, पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब कापरे, बादशाहभाई शेख, शुभांगी धायगुडे, सपना माळी, गौरी पिंगळे, बाळासाहेब तोंडे पाटील ,श्रीकृष्ण मोरे, स्वप्निल भागवत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संजय ईनामके सारिका भुजबळ, मोहन टूले, मंगेश रायकर, उत्तमराव गायकवाड, डी. डी. बारवकर, संजय पवार आदींसह या मेळाव्यास दौंड तालुक्यातील असंख्य ओबीसी, एससी, एसटी, धनगर आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.