Israel Hamas War : नवी दिल्ली : एक महिन्यापासून गाजा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. १० हजारोंच्यावर नागरिक या युद्धा दरम्यान मारले गेले आहेत. त्यामुळे तिथे कामगार वर्गाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी इस्रायलमध्ये भारतीयांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील कंपन्यांनीच थेट तशी मागणी केली आहे. सध्या केअरींग क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना लाखाच्या घरात तिथ वेतन मिळत आहे.
बांधकाम उद्योगात मागणी
90 हजार पॅलेस्टाइनच्या जागी 1 लाख भारतीय कामगारांची भरती करण्याची कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी इस्रायली बांधकाम उद्योगाने आपल्या सरकारकडे परवानगी मागितली आहे. युद्ध सुरु झाल्यानंतर ज्या पॅलेस्टिनींचे वर्क परमिट रद्द केले, त्याजागी भारतीय कामगारांना परवानगी द्या, अशी इस्रायली कंपन्यांची मागणी आहे. इस्रायलने आपल्याकडे नोकरी करणाऱ्या पॅलेस्टाइन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. ‘आता आमची भारतासोबत चर्चा सुरु आहे. भारतीय कामगारांची भरती करण्याच्या निर्णयाला सरकारकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे’ असं इस्रायलच्या बिल्डर्स असोशिएशनचे उपाध्यक्ष हॅम फिग्लिन यांनी सांगितलं. वेस्ट बँकमधील वॉइस ऑफ अमेरिकेच्या एका रिपोर्ट्मध्ये हे म्हटलं आहे. ‘इस्रायलमध्ये बांधकाम उद्योग सुरळीत सुरु रहावा तसेच स्थिती सामान्य करण्यासाठी आम्हाला भारतातून 50 हजार ते 1 लाख श्रमिकांच्या भरतीची परवानगी मिळेल’ असं हॅम फिग्लिन यांनी म्हटलय.
भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची कुठलीही प्रतिक्रिया नाही
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सध्या या रिपोर्ट्वर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायली बांधकाम उद्योगात पॅलेस्टाइन कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 25 टक्के आहे. इस्रायलमध्ये नोकरी करणाऱ्या 25 टक्के पॅलेस्टिनींपैकी 10 टक्के श्रमिक गाजामधून आहेत, तर उर्वरित वेस्ट बँक क्षेत्रातील आहेत. मे महिन्यात इस्रायलने भारतासोबत एका करारावर स्वाक्षरी केली. त्यात 42 हजार भारतीयांना इस्रायलमध्ये नोकरीची परवानगी मिळणार आहे. नर्सिग म्हणजे केअरींग क्षेत्रात भारतीय इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीवर आहेत.