Jeevan Praman: पुणे : केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी आवश्यक असणारा हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) या महत्त्वाच्या कागदपत्रासाठी अनेकदा पायपीट करावी लागत होती. यावर पुणे ग्रामीण डाक विभागाने त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरपोच हयातीचा दाखला देण्याची मोहीम राबवली आहे.
केंद्र तसेच राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळते. दरवर्षी प्रत्येक सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हयातीचा दाखला पेन्शन विभागाकडे डिसेंबर पर्यंत सादर करावा लागतो. हा दाखला वेळेत त्या विभागाकडे जमा न केल्यास संबंधिताचे निवृत्ती वेतन बंद होते. यासाठी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जास्त पैसे देत एखाद्या खासगी संगणक केंद्रावरून हयातीचा दाखला तयार करावा लागत असे. तसेच नेट संबंधित अडचणी आल्यास अथवा सर्व्हर डाऊन झाल्याने त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तालुक्याच्या ठिकाणी नाहक हेलपाटे पडत असत. परंतु आता डाक विभागामुळे ही पायपीट थांबणार आहे.
पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक डाकघर श्री बी.पी. एरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त सेवानिवृत्त कर्मचान्यांनी घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या डाक घराशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी १० वर्षांनंतर आधार अद्ययावत करावे
सरकारी आदेश नुसार Aadhar document update project अंतर्गत प्रत्येक नागरिकाने १० वर्षांनंतर आपले आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे. पुणे ग्रामीण विभागांतर्गत येणारे डाकघर, आळंदी देवाची, अवसरी खु., भोर, चाकण, देहूगाव, देहू रोड कॅनट, घोडेगाव, जुन्नर, कोरेगाव भीमा, लोणावळा बाझार, मंचर, नारायणगाव, ओतूर, राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, तळेगाव जी एच. व उरुळीकांचन येथे आधारची सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना नवीन आधार किंवा आधार अपडेट करायचे असेल त्यांनी वरील दिलेल्या डाक घरांना भेट द्यावी व आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा असल्यास आपल्या भागातील पोस्टमनशी संपर्क साधावा. आधार संदर्भात कोणतेही काम न झाल्यास व काही अडचण आल्यास तक्रारीसाठी (दूरध्वनी क्र. ०२०-२५५१०१२५) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे डाकघर अधीक्षक बी. पी. एरंडे यांच्याद्वारे करण्यात येत आहे.