Pune Crime : पुणे : महिला घरातही सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. सुनेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी सासऱ्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी ३२ वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार ६२ वर्षीय सासऱ्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला आणि तिच्या पतीचा वाद झाल्यामुळे ते विभक्त राहत होते. दरम्यान, फिर्यादी महिला हिंगणे खुर्द परिसरातील एका मंदिरासमोर थांबली असता, सासरा तेथे आला. सुनेला उद्देश्यून म्हणाला की, आपल्या समाजात दुसरे लग्न करण्याची पद्धत नाही. मी तुला एक सदनिका घेऊन देतो. मात्र, याबाबत मुलगा आणि सासूला काही सांगू नको. मी तुझा सांभाळ करेन, असे सांगून सुनेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.