Sheikh Hasina: ढाका: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना अमेरिकेच्या प्रसिद्ध मासिक टाइमच्या कव्हर पेजवर स्थान मिळविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेतून आपले सरकार हटवणे अवघड असल्याचे त्यांनी टाइमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. बांगलादेशमध्ये जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधानांच्या निवडणुका होणार आहेत.
टाईमला दिलेल्या मुलाखतीत शेख हसीना म्हणाल्या की, माझी जनता माझ्या पाठीशी आहे, यावर माझा विश्वास आहे. ते माझे मुख्य बलस्थान आहे. लोकशाही व्यवस्थेतून मला हटवणे इतके सोपे नाही. मला काढून टाकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांनी माझा नाश करणे. मी माझ्या लोकांसाठी मरायला तयार आहे. न्यूयॉर्कस्थित वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हसीना यांनी मासिकाच्या २० नोव्हेंबरच्या आवृत्तीच्या कव्हर पेजवर स्थान मिळाले आहे. ही आवृत्ती 10 नोव्हेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल.
टाईमच्या चार्ली कॅम्पबेलने कव्हर स्टोरीमध्ये नमूद केले की, वयाच्या ७६ व्या वर्षी बांगलादेशच्या पंतप्रधान अशा राजकीय विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात ज्याने १७ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचे ग्रामीण ताग उत्पादक ते आशिया पॅसिफिक प्रदेशातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये बदलले. यापूर्वी 1996 ते 2001 पर्यंतच्या कार्यकाळानंतर 2009 पासून पदावर असताना, त्या जगातील सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या महिला राष्ट्रप्रमुख आहेत. कॅम्पबेल यांनी लिहिले की, मार्गारेट थॅचर किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षा जास्त वेळा निवडणुका जिंकलेल्या हसीना या जानेवारीतही या पदावर कायम राहण्यास वचनबद्ध आहेत.
शेख हसीना यांच्या हत्येचे 19 प्रयत्न
पीटीआयच्या वृत्तानुसार, चार्ली कॅम्पबेल यांनी टाईम मासिकात नमूद केले आहे की, शेख हसीना पंतप्रधान असताना 19 वेळा त्यांच्या हत्येचे प्रयत्न झाले. अलिकडच्या काही महिन्यांत मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या समर्थकांची सुरक्षा दलांशी चकमक झाली, ज्यामुळे शेकडो लोकांना अटक झाली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) हा कट्टर इस्लामिक पक्ष आहे, जो पाकिस्तानकडे अधिक झुकलेला आहे.
बीएनपी समर्थक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांची वाहने आणि सरकारी बसेस जाळण्यात आल्या आणि अनेक लोक मारले गेले. बीएनपीने 2014 आणि 2018 प्रमाणे निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे वचन दिले आहे.