Mumbai University: मुंबई : निकाल लावताना दिरंगाई, उत्तर पत्रिका गहाळ, नुकत्याच प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका झेरॉक्स सेंटरवर सापडल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून परीक्षा विभाग प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणीही युवा सेनेने केली आहे. यापूर्वी देखील विद्यापीठातील उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे प्रकरण समोर आले होते. आता त्यानंतर उत्तरपत्रिका झेरॉक्स सेंटरवर सापडल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अत्यंत गलथान कारभार सुरू असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. दुरस्थ व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर सापडल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणत्याही विद्यापीठाचा परीक्षा विभाग अत्यंत गोपनीय समजला जातो, मात्र याच विभागातील उत्तर पत्रिका बाहेर कशा काय आल्या असा सवाल युवा सेनेने केला आहे.