पुणे: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अजित पवार गटासोबत असल्याचा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केला होता. त्यानंतर कोल्हे यांनी आपली भूमिका बदलली का? अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी दुसऱ्या दिवसापासून शरद पवारांच्या सोबत आहे, भूमिका बदलली नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी अमोल कोल्हे हे आपल्यासोबत असल्याचा दावा आज माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच कोल्हे यांनी प्रतिज्ञापत्र अजित पवारांना दिलं असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानंतर कोल्हे यांनी आपण मात्र शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे?
अजित पवार यांच्या शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. आज ही मी त्यांच्यासोबत आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही मी पवार साहेबांसोबत असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज मला तरी वाटत नाही. मी कोणतीही भूमिका बदलली नाही.
सुनील तटकरे काय म्हणाले होते ?
पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या लोकसभेतील खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात पीटीशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे, असं तटकरे यांनी म्हटलं होतं.