Sanjay Raut Criticize Pm Narendra Modi : मुंबई : संजय राऊत यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंचं उपोषण यावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास महाराष्ट्र पेटेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
आरक्षण केंद्र सरकारच्याच हातात : सरकारला किती वेळ हवा आहे असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे. त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत आहेत का? सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना जरूर भेटावं, हा सरकारचा अधिकार आहे. सरकारने जरांगेंशी चर्चा करावी. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आदिवासी, ओबीसी किंवा इतर समाज अशा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी. हे करणं केंद्र सरकारच्याच हातात आहे.”
महाराष्ट्र पेटेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतले आहेत, कारण त्यांना माहित आहे की मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे. तरीही अमित शाह छत्तीसगडपासून मिझोरामपर्यंत फिरत आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात लोक आत्महत्या करत आहेत. मनोज जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.
मोदींनी मनोज जरांगेंना फोन करून बोललं पाहिजे : संजय राऊत पुढे म्हणाले, “सरकारला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? त्यासाठीच हे सर्व चालू आहे का? पंतप्रधान मोदींनी किमान दुरध्वनीवरून मनोज जरांगेंशी बोलले तरी पाहिजे. तेही बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही का? मोदी एक-एक तास मन की बात करतात, जगभरात फिरतात, जगभरातील नेत्यांना मिठ्या मारतात, पण महाराष्ट्राच्या सुपुत्राने आपला जीव पणाला लावलाय त्याच्याशी बोलायला वेळ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? त्यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे ना? त्यांनी जरांगे पाटलांचे प्राण वाचवावेत, असंही राऊतांनी नमूद केलं.