पुणे : सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी गावात हक्काची स्मशानभूमी नसल्याने नागरिकांनी रस्त्यावर अंत्यविधी केला असल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.११) घडली आहे. पुणे सारख्या मेट्रो सिटी असलेल्या परिसरात अशी घटना म्हणजे प्रशासन विदारक चित्र दाखवणारी आहे. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे शहरापासून अगदी ३० ते ३५ किमी अंतरावर असलेले हे गाव. या गावात स्मशानभूमी नाही. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. वाहणारे पाणी ओसरण्यसाठी नागरिकांना तब्बल तीन तासाहून अधिक वेळ अंत्यविधी करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. पाऊस थांबत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी चक्क रस्त्यावर अंत्यविधी करावा लागला. त्यामुळे पुणे शहरापासून जवळ असूनही अशी वेळ आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव चित्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारे आहे. घेरा सिंहगडमध्ये आठ ते दहा लहान मोठी गावे असून बहुतांश गावात अद्यापही स्मशानभूमीची सोय नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा पर्दाफाश झाल्याचे पहायला मिळाले आहे.
दरम्यान, येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच नसल्याने येथे राज्य सरकार व जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी रस्त्यातच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले जातात. ग्रुप ग्रामपंचायत असलेली घेरा सिंहगडला चार महसुली गावे आहे. गावठाण मागणीचे प्रस्ताव राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे धूळखात पडलेले आहेत.