Pune News : स्वारगेट, (पुणे) : उभी असलेली रिक्षा चोरी करून घेऊन निघालेल्या एकाला चौघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांनाही स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सचिन राजेंद्र नाईक (वय ३२, रा. धनकवडी), गणेश राजेंद्र नाईक (वय ३६, रा. आंबीलवाडा), अमोल वसंत घोलप (वय ३८, रा. कात्रज), प्रकाश सखाराम घाटे (वय २०, रा. स्वारगेट) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा रंगमंचासमोर उभा असलेली रिक्षा अनोळखी तरुण पळवून घेऊन जात होता. तेव्हा काही जणांनी त्याला पाहिले. पाठलाग करून त्याला पकडलेही. रिक्षा चौघा आरोपीपैकी एकाची होती. त्याला पकडल्यानंतर चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तर लाकडी दांडके त्याच्या डोक्यात घालून त्याचा खून केला.
दरम्यान, सर्वचजण फरार झाले होते. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्याचा तपास करण्यात आला. तसेच पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या चौघांनी त्याला ठार मारले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली. चौघेही रिक्षा चालक आहेत. ते स्वारगेट परिसरात रिक्षा चालवित आहेत.
म. टा. प्रतिनिधी, पुणे : रेल्वे गाडीमध्ये अथवा स्थानकावर एखादा जखमी झाल्यास त्याला आता पुणे रेल्वे स्टेशन येथे तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. त्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेला वैद्यकीय कक्ष चोवीस तास प्रवासी व सामान्य नागरिकांसाठी सुरू राहणार आहे.
या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिकचे चेअरमन डॉ. पी. जी. ग्रांट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे रेल्वे विभागाच्या रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. के. संजीव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रुबी हॉल क्लिनिकचे बेहराम खोदाइजी, डॉ. प्रसाद मुगळीकर यासह रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ट्रेनमधून खाली पडणे किंवा अन्य वैद्यकीय आपत्तीत तत्काळ उपचार या कक्षातील डॉक्टरांच्या मदतीने देण्यात येईल. या कक्षामध्ये ईसीजी, डिफिब्रिलेटर, पुनरुत्थान सुविधा, नेब्युलायझर आदी सुविधा आहेत. तसेच स्वतंत्र औषध विक्री विभाग असून, आपत्कालीन परिस्थितीत लागणारी सर्व औषधे येथे उपलब्ध होतील. रूबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
आपत्कालीन वैद्यकीय सेवा कक्षातील सुविधा
– एक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी अशी टीम २४ तास उपलब्ध
– रेल्वे प्रवाशांना प्राथमिक उपचार मोफत; तर अन्य नागरिकांसाठी शंभर रूपये फी
– आपत्कालीन स्थितीत घटनेपासून रुग्णालयात तात्काळ रुग्णवाहिका सुविधा
– आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेत जावूनही तपासणी करणार
– ईसीजी, डिफिब्रिलेटर, नेब्युलायझर आदी सुविधा उपलब्ध
– स्वतंत्र औषधालयाची व्यवस्था