Babri Masjid : राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारीला मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदीही हजर राहणार आहेत. त्या पार्शवभूमीवर, आता मुस्लीम समाजाकडूनही एक मागणी केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी नव्या बाबरी मशीदीची पायाभरणी करावी अशी विनंती इंडियन मुस्लिम लीगकडून करण्यात आली आहे.
नाराजी व्यक्त
इंडियन मुस्लिम लीगने मशिदीच्या बांधकामाच्या गतीवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रभू रामाची मूर्तीची जानेवारीत प्राणप्रतिष्ठा होणार असताना मशिदीची पायाभरणीही अद्याप झालेली नाही. त्यामुळे मशिदीच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी ज्या ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली होती. आता त्या फाऊंडेशनचे विश्वस्त बदलण्याची मागणी केली जात आहे.
ज्यावेळी भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधानांकडून होणार आहे, त्यावेळीच मशिदीची पायाभरणी मोदींनी करावी, अशी विनंती मुस्लीम समाजाकडून करण्यात आली आहे. इंडियन मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल अन्सारी म्हणाले की, “पंतप्रधान एका शुभ मुहूर्तावर अयोध्येत येत आहेत. त्याचवेळी त्यांच्या हस्ते मशिदीचेही काम सुरू करण्याची विनंती करतो.”
इक्बाल अन्सारी यांचे आरोप : इक्बाल अन्सारी यांनी इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या सदस्यांना मशिदीच्या बांधकामातील विलंबासाठी जबाबदार धरले आहे. विश्वस्त चांगले असते तर आतापर्यंत मशिदीची काहीतरी कामे झाली असती, मात्र नाही. मशिदीच्या बांधकामात सरकारने सहकार्य करावे आणि विश्वस्तही बदलावे, असे इक्बाल अन्सारी म्हणाले.