नवी दिल्ली: शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तसेच या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुधारित वेळापत्रक सादर करण्याची शक्यता होती. पण नार्वेकर यांनी ते सादर केले नाही. यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच राहुल नार्वेकरांना सुनावणीचे सुधारित वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी दिली आहे. आता या प्रकरणी येत्या 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
कोर्ट काय म्हणाले?
11 मेला घटनापीठाने निकाल दिल्यापासून अध्यक्षांनी काहीही केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधिशांनी पुन्हा केली आहे. तुम्ही दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्ही ठोस निर्णय घेणार नसाल, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. सर्वात महत्वाचे याचिका ही निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झलेले छोटे मोठे निर्णय आम्हाला सांगू नका, फक्त अध्यक्षांचे वेळापत्रक द्या. तसेच दसऱ्याच्या सुट्टीमध्ये अध्यक्षांबरोबर बसून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता वेळापत्रक ठरवतील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.