नाशिक : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी पुन्हा या संदर्भात लवकरच पुरावे सादर करणार असल्याचे सांगितल्याने हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. आज बुधवारी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा दादा भुसे यांची चौकशी करा, अशी मागणी केली. तसेच दादा भुसें आणि ससूनचे माजी अधिष्ठाता काळे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, अशी मागणी केली आहे. तसेच माझ्याकडे असलेले पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील ड्रग्ज प्रकरण आता चिघळू लागले असून यात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतल्याचे दिसत आहे. मंगळवारी सुषमा आंधारे यांनी थेट दादा भुसे यांचे नाव घेत आरोप केला होता. यावर मंत्री दादा भुसे यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत खुशाल चौकशी करा, असे प्रतिआव्हान दिले आहे. तसेच चौकशीनंतर सत्य बाहेर येईल.केलेले आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले होते.
ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल
ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर या फोटोची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. तर दुसरीकडे या फोटोत दिसणारे मंत्री दादा भुसे यांनीच ललित पाटीलला मातोश्रीवर आणलं होतं, असा आरोप ठाकरे गटाने आहे. त्यामुळे या फोटोवरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
तोपर्यंत अंधारे यांना नाशिकमध्ये प्रवेश करू देणार नाही
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर केलेल्या आरोपांवरून शिंदे गट आक्रमक झाला आहे. नाशिकमधील शिंदे गटाने रस्त्यावर उतरत सुषमा अंधारे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं आहे. सुषमा अंधारे यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत नाशिकमध्ये सुषमा अंधारे याना प्रवेश देणार नाही असा इशारा शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.