पुणे, ता.०४ : आपलं आरोग्य चांगलं, निरोगी राहावं यासाठी प्रयत्न केला जातो. त्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, फळे या सर्व गोष्टींचे पालन केले जाते. पण काहींना आरोग्य समस्या सतावत असतेच. त्यात रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर ही एक गंभीर समस्या बनली आहे. ब्लड प्रेशर वाढणे आणि कमी होणे हे दोन्हीही शरीरासाठी खूप घातक आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर ज्याला हायपरटेन्शन देखील म्हटलं जातं. हाय ब्लड प्रेशर फक्त ज्येष्ठांनाच नाही तर आताच्या युवा पिढीला देखील सतावत आहे. ब्लड प्रेशर अधिक झाल्यास अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात. त्यामध्ये हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
नारळाचे पाणी सर्वोत्तमच
काहीजरी आजार असला तर आपण नारळ पाणी पिण्याला प्राधान्य देतो. हेच नारळाचे पाणी सर्वोत्तम मानले जाते. हे केवळ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त नाही तर इतर अनेक आरोग्य समस्यांपासून देखील आराम मिळवून देऊ शकते. यामध्ये पोटॅशियम आढळते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करते.
केळी ब्लड प्रेशरवर प्रभावी
केळी ही ब्लड प्रेशरवर प्रभावीपणे काम करते. त्याचा फायदाही आहे. केळीमध्ये असलेले पोटॅशियम सोडियमचा प्रभाव कमी करते. हे रक्तवाहिन्यांमधील ताण कमी करते. केळीमध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे एक दिवसाआड केळ खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
खजूर हाय ब्लड प्रेशरसाठी वरदान
खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते, तर त्यामध्ये सोडियमचे प्रमाणही कमी असते. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम दोन्ही रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह सुलभ करण्यासाठी आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उत्कृष्ट आहेत.