अजित जगताप
वडूज : खटाव तालुक्यातील भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व सातेवाडी सरपंच सौ वृषाली विक्रम रोमन यांनी आज गौरी गणपती सणानिमित्त सातेवाडी मध्ये विधवा माता-भगिनी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. यावेळी अनेक महिलांना आठवणीने अश्रू अनावर झाले होते.
विधवा माता भगिनीं एकेकाळी सुवासिनी म्हणून समाज्यात वावरल्या होत्या.त्यांना पुन्हा समाजात तशीच समानतेची वागणूक मिळावी यासाठी आज ग्रामदैवत जानुबाई देवी यांच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ सुरेखा बोटे, सौ उषा बोटे, माजी उपसरंच सौ संगीता बोटे, वंदना बोटे, निलम सुतार, सुमन माने, सोनाली काळे, चंद्रकला पवार, कांताबाई काळे, विद्या राऊत, ताराबाई रोमन, वंदना रोमन, निलोफर पिंजारी, रंजना माने , लक्ष्मी डोंबाळे, लता मुळे, शारदा देशमुख आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या. त्यांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून जेष्ठ महिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले
यावेळी बोलताना सातेवाडी सरपंच सौ रोमन म्हणाल्या, सध्या एकविसाव्या शतकात महाराष्ट्रात विधवा प्रथाबंदी साठी चळवळ उभी राहत आहे. या चळवळीत सातेवाडी ता खटाव ग्रामस्थांनीही सहभाग घेतला. फक्त सातेवाडी गावापूरते सहभाग न घेता लवकरच संपुर्ण खटाव तालुक्यात ही चळवळ उभी करणार आहे. आज विधवा महिलांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरण्यात आली. विशेषतः या विधवा महिलांसाठी हिरव्या बांगड्या भरून जानुबाई देवीची ओटी या महिलांच्या हस्ते भरण्यात आली.
यावेळी सुमन माने या म्हणाल्या, विधवा महिलंना सर्वच कार्यक्रमात सुद्धा समानतेची वागणूक मिळाली पाहिजे तसेच आता दररोज कपाळावर कुंकू दिसले पाहिजे. आज सरपंच सौ रोमन यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे खरोखर कौतुक केले पाहिजे, आज त्यांच्या या निर्णयामुळे समाजात इतर महिलाप्रमाणे वागणूक मिळेल, आणि ही बाब खरोखर खूप चांगली आहे.असे गौरव उदगार काढले.
दरम्यान, स्वतंत्र दिनी दि १५ ऑगस्ट चे ध्वजारोहण हे बारावी व प्रजासत्ताक दिनी दि २६ जानेवारीला दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय सातेवाडी ग्रामपंचायत वतीने घेण्यात आला असल्याचे सरपंच सौ वृषाली रोमन यांनी सांगितले.