हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रमेश चव्हाण यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता.१) सकाळी १० ते ११ या वेळेत स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सकाळी १० ते ११ या दरम्यान स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार गावातील प्रत्येक प्रभागात ही मोहीम राबविली होती. यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व ग्रामस्थ, शाळा, हायस्कूल व कॉलेजचे विद्यार्थी शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, बचत गट, तरूण मंडळ, महिला मंडळ, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत श्रमदान कार्यक्रम पार पडला.
यावेळी हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नुरजहा सय्यद, रेल्वे क्षेत्रीय समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, सदस्य मयूर कांचन, शंकर बडेकर, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, आदी पदाधिकारी व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला होता.
उरुळी कांचन शहरातील विविध भागात हजारो नागरिकांनी शहर स्वच्छता उपक्रमात सहभाग घेत कचरा संकलित केला. उरुळी कांचन शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आल्याने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा हटवण्यात आला आहे. यावेळी हातात झाडू घेत शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याने या मोहिमेत सहभागी झालेले अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी देखील उत्साहाने सहभागी झाले होते.
दरम्यान, स्वच्छता पंधरवड्यानिमित्त देशभरात रविवारी स्वच्छतेसाठी एक तास हे अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत उरुळी कांचनसह परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समाजाच्या अनेक स्तरातील नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवित एक तास स्वच्छता अभियानासाठी देऊ केला.
उरुळी कांचन येथे महात्मा गांधी यांचे काहीकाळ वास्तव्य..
उरुळी कांचन (ता. हवेली) या ठिकाणी महात्मा गांधी यांचे काहीकाळ वास्तव्य होते. तसेच पद्मश्री मणिभाई देसाई यांनी महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून उरुळी कांचन या गावातून कार्य सुरु केले होते. त्यामुळे उरुळी कांचन गावाची निवड केली असल्याचे रमेश चव्हाण यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम..
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने उरुळी कांचन परिसरात साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत लोणी काळभोर, शेलारवाडीसह परिसरातील एकूण ७८ सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या प्रतिष्ठानच्या वतीने स्मशानभूमी, दफनभूमी, दातार कॉलनी परिसर, बायफ रोड, परिसर या प्रतिष्ठानकडून स्वच्छ करण्यात आला.
टिळेकरवाडीत स्वच्छता मोहीम..
टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत सकाळी १० ते ११ या दरम्यान स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, गावातील सर्व प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी स्मशानभूमी ग्रामपंचायत परिसर, शाळा, अंगणवाडी या परिसरात कचरा साफ सफाई श्रमदान अभियान घेण्यात आले. यावेळी सरपंच सुभाष लोणकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री दत्तसेवा ट्रस्ट, जिल्हा परिषद शाळा, शिक्षक सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, कर्मचारी हे सर्व या अभियानास उपस्थित होते.