पुणे : पुण्यात गणेशोत्सव काळात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेशही दिले आहेत. परंतु, गणेशोत्सवाच्या काळात दारूबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील २ पब मालकांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. आणि या कारवाईत आरोप सिद्ध झाल्यास त्या २ पब वरती कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने, परमीट रुम, बिअरबार बंद ठेवावे तसंच या कालावधीत मद्यविक्री सुरु राहिल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. तरीदेखील पुण्यातील २ पबमध्ये प्रिंटेड बिले देत दारु विकण्यात आली होती. हा प्रकार युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता.
दरम्यान, सदर घटनेची गंभीर दखल घेत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून दोन्ही पब सध्या बंद करण्यात आले आहेत. तथापि, शहरातील अनेक हॉटेल्स, पब आणि दारूची दुकाने या निर्देशांबद्दल गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या आता पब मालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.