पुणे : शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा शोध घेवून अवघ्या चार तासाच्या आत पुणे ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दोन सख्ख्या बहिणी भांगरवाडी (लोणावळा ता. मावळ) येथील कन्या विद्यालयात गेल्या होत्या. परंतु दुपारी २ वाजेपर्यत त्या दोघी घरी न आल्याने मुलींचे वडिलांनी शाळेमध्ये चौकशी केली असता, सदर वेळी त्या शाळेत आल्या नसल्याचे शाळेतुन कळविण्यात आले. मुलींच्या वडिलांनी मुलींचा आसपास परिसरात शोध घेतला असता, त्या मिळुन आल्या नाहीत.
त्यानंतर मुलींच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांना यासंदर्भात माहिती दिली. माने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन सदरची माहीती तात्काळ वरिष्ठांना कळविली. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा विभागातील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन तात्काळ रवाना केल्या.
दरम्यान,सदर तपास करीत असताना पोलिसांना बेपत्ता मुली पुणे रेल्वे स्थानकावर दिसल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, मुली हया पनवेल – नांदेड या रेल्वेने नांदेडकडे जात असल्याची समजले. त्यानंतर पुणे पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांनी संपर्क साधून वरील माहिती फोनव्दारे दिली.
उस्मानाबाद पोलिसांनी तात्काळ सदर घटनेचे गाभिर्य लक्षात घेऊन, आज रविवारी (ता.४) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर आनंदनगर पोलिसांना तात्काळ रवाना केले. रेल्वे गाडी उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचताच आनंदनगर पोलिसांनी दोन्ही मुलींचागाडीत शोध घेतला असता, दोन्ही मुली गाडीत आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. त्यानंतर आनंदनगर पोलिसांनी दोन्ही मुलींना लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात सुपूर्त केले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक अडोदे, उस्मानाबाद आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चौनसिंग गुसिंगे , पोलीस नाईक पाडुरंग बोचरे राजु थोरात सहा. उप पोलीस निरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस हवालदार घुगे, पवार, शेख, भुषण कदम, प्रणय उकिर्डे, शरद जाधवर, सचिन शेलार, अरुण पवार आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पाडुरंग बोचरे, राजु थोरात यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.