गणेश सुळ
Daund News : केडगाव : देलवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जय मल्हार विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त, फुलांची आकर्षक सजावट तसेच रंगीबेरंगी पताका व फुग्यांची सजावट केलेल्या बैलगाडीमधून कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेची पारंपरिक ढोल-लेझीमच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर देलवडी गावांतर्गत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच निलम काटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचे स्वागत केले. तर मुलांनी लेझीम व झांज पथकातील खेळ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यालयात विविध स्पर्धा
मिरवणुकीदरम्यान ‘कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ अशा विविध घोषणा देत मुलांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी देलवडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले गणेश खेडेकर, (Daund News ) गणेश शेलार, सुवर्णा शेलार, मनिषा कर्णवर, माधुरी शेलार, उज्वला चांदगुडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘महापारेषण’मध्ये नियुक्ती झालेली भाग्यश्री शेलार व वन विभागात भरती झालेला गणेश कर्नवर यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले.
विद्यालयात कर्मवीर जयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, क्रिकेट, कबड्डी, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. विद्यालयातील मुख्याध्यापक कदम व अध्यापक वर्ग यांनी झांजपथक व लेझीम पथकासाठी मार्गदर्शन केले. मिरवणुकीनंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवाजी वाघोले, विकास शेलार, (Daund News ) बाळासाहेब वाघोले, राजाभाऊ काटे, गोपाळ शेलार, दत्ताभाऊ शेलार, गणुमामा लव्हते, दत्तात्रय शेलार, भानुदास टकले, राजाभाऊ शेलार, बाप्पूराव शेलार, महादेव शेलार, माधव टकले, पांडुरंग शेलार, तात्या काळे, किशोर शेलार, सागर निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोंढे यांनी केले. तर आभार देशमुख यांनी मानले. मान्यवरांच्या वतीने उपस्थितांना अन्नदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.