गणेश सुळ
Daund News : केडगाव : सध्याचे वातावरण अक्षरशः गणपतीमय झाल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. श्रीगणेश हे सबंध हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे. म्हणूनच की काय या सणात अबालवृद्धांचा सहभाग पाहायला मिळतो. असे असले तरी या महोत्सवात प्रामुख्याने तरुणाईचाच उत्साह ओसंडून वाहत असतो.
राज्यात सत्तांतर झाल्याने दौंड तालुक्यात यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सरपंच अशा विविध पदांवर विराजमान होण्यासाठी जो तो कंबर कसून आहे. (Daund News) चौकाचौकातील इच्छुक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. असे जरी असले तरी एकमेकांचे गूज मात्र कुणीच ऐकताना दिसत नाही.
इच्छुक मंडळी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील
रस्ते, वीज,पाणी हे मुलभूत प्रश्न आजही उत्तराच्या, निराकरणाच्या प्रतिक्षेत आहेत. जनतेच्या या प्रश्नांची उकल कोण करतो आणि दौंडच्या दुखऱ्या नसांवर विकासाची मलमपट्टी कोण लावतो हे येणारा काळच सांगेल. तूर्तास मात्र सगळीकडे गणपतीचे भक्तीमय वातावरण आहे. (Daund News) यानिमित्ताने विविध मंडळांना भेटी देणे, भरमसाठ वर्गणी, आरतीला हजेरी लावणे इ.प्रकारेही इच्छुक मंडळी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील दिसतील.
याप्रकारे जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध विकासकामांच्या उद्घाटनांचे फवारे उडवले जात आहेत. ‘आपणच जनतेचे खरे सेवक आहोत’ अशी दिवास्वप्ने ज्याला-त्याला पडू लागली आहेत. दौंड शहर व दौंडमधील ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण होताना दिसत आहे. (Daund News) गगनचुंबी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. या सोसायट्यांमधील रहिवासी हे उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही तितक्याच वास्तववादी आहेत. या सोसायट्यांवर वर्चस्व राखण्यासाठी तूफान रस्सीखेच होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, पाण्याअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पिके जळून नष्ट होऊ लागली आहेत. जनावरे हिरव्या चाऱ्याअभावी हंबरडा फोडत आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. याकडे मात्र कोणी लक्ष द्यायला तयार नाही.
निवडणुका रंगतदार होणार की चुरशीच्या?
तसे पाहता बिनीच्या शिलेदारांनी आपल्या तलवारी अजूनही म्यानातच ठेवलेल्या आहेत. ऐन रणधुमाळीतच त्यांचे दर्शन होईल, असे दिसते. एकंदरीत दौंड तालुक्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका रंगतदार होणार की चुरशीची हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : देलवडी सेवा सोसायटीच्या वतीने १२ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय
Daund News : दौंड क्रीडा संकुलातील विकासकामांसाठी २ कोटींचे अंदाजपत्रक