Pune News : पुणे : ‘पार्ट टाईम’ नोकरी मिळवून देतो असे सांगत, ऑनलाईन टास्कमध्ये गुगलवर रिव्ह्यू दिल्यास बँक खात्यात जास्त पैसे जमा होतील, असे सांगून एकाची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी गुरुवारी (ता. १४) मुंबईतून अटक केली.
आरोपीला मुंबईतून अटक
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तुषार प्रकाश अजवानी (वय ३७, रा. वॉटरफोर्ड, जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) तुषारने फिर्यादीला ‘पार्ट टाईम’ नोकरीचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला. त्यानंतर गुगलवर एका कंपनीला रिव्ह्यू दिल्यास बँक खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानुसार तुषार आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा करुन विश्वास संपादन केला. आरोपींनी जास्त फायदा मिळवून देण्यासाठी टेलिग्रामवर लिंक पाठवून, बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले.
अती लोभापायी फिर्यादींनी वेळोवेळी ३४ लाख ९७ हजार रुपये रक्कम जमा केली. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुणे सायबर पोलिसांनी बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला असता, आरोपी मुंबईतील जुहू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.(Pune News) त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस अंमलदार अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनील सोनुने यांचे पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने आरोपी तुषार याचा शोध घेऊन गुरुवारी अटक केली. न्यायालयाने आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.