Big Breaking : जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. १४) समजूत काढल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे.
अखेर उपोषण मागे..
अंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर इत्याही नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थळी पोहोचतात मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की, मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचं आहे.