पुणे : दुकानात खरेदी केल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्याचा दावा करून खोटा स्क्रीनशॉट दाखवणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. याने एक-दोन नाहीतर तब्बल ३०० ते ४०० दुकानदारांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला लोहगाव येथील राहत्या घरातून अटक केली. त्याची पत्नीही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तिलाही बेड्या ठोकल्या.
गणेश शंकर बोरसे (वय ३४) आणि त्याची पत्नी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एनईएफटीच्या माध्यमातून तो पैसे पाठवल्याचा बनावट मेसेज दुकानदारांना दाखवत असायचा. दुकानात खरेदी केल्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्याचा दावा करून स्क्रीनशॉट दाखवत असायचा. पण जेव्हा दुकानदार खात्यात रक्कम जमा न झाल्यास तेव्हा तो त्याचा मोबाईल नंबर दुकानदाराला द्यायचा आणि नंतर निघून जायचा. मात्र, नंतर फोन केला तर फोन बंद लागायचा. अशाप्रकारे गणेश आणि त्याच्या पत्नीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३०० ते ४०० दुकानदारांची फसवणूक केली.
राहत्या घरातून आरोपीला अटक
सुमारे ४०० दुकानदारांना फसवणाऱ्या आरोपीला लोहगाव येथील राहत्या घरातून अटक केली. या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असलेल्या त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना या तरूणाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
हार, पाणीपुरीवाल्यालाही नाही सोडलं
या पती-पत्नीने फळ विक्रेते, गादी, सायकल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वस्तू, गिफ्ट, स्टेशनरी, नर्सरी, किराणा, मेडिकल, केक, मसाले आणि इतकेच काय तर हार, पाणीपुरीवाल्यालाही सोडलं नाही. या सर्व दुकानदारांना त्यांनी गंडा घातला.