Pune News : पुणे : मोबाईल चोरीसाठी कोण काय शक्कल लढवेल, सांगता येत नाही. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात असाच धक्कादायक प्रक्रार उघडकीस आला आहे. रात्रीच्यावेळी फेरफटका मारत असलेल्या तरुणांना आपण सिक्रेट पोलीस असल्याची बतावणी करत, तुम्ही मुलींचे चोरून व्हिडिओ काढले आहेत, तुमचा मोबाईल दाखवा, असे सांगत चोरट्याने मोबाईलसह धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याणीनगर परिसरात धक्कादायक प्रक्रार
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कल्याणीनगर येथील कुमार सिटी सोसायटीच्या गेटजवळ रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कल्याणीनगर येथील एका २१ वर्षांच्या तरुणाने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मित्रांसोबत जेवण झाल्यानंतर फिर्यादी शतपावली म्हणून फेरफटका मारत होते. दरम्यान, कल्याणीनगर येथील कुमार सिटी सोसायटीच्या गेटजवळ आले असता, एक जण मागून मोटारसायकलवरुन आला. आपण सिक्रेट पोलीस असल्याची बतावणी त्याने केली आणि तरुणांना दमात घेतले.
दरम्यान, याच भागातील दोन मुलींचे फोटो आणि व्हिडीओ तरुणांनी काढल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, असे सांगत त्याने लांबूनच आपले आयकार्ड तरुणांना दाखवले. ते तरुण तुम्हीच असण्याची शक्यता आहे. तुमच्या मोबाईलची गॅलरी दाखवा, असे म्हणत त्याने तरुणांना दम भरला. आयकार्ड पाहिल्यानंतर तरुणांची खात्री पटली. त्या दोघांनीही मोबाईलमधील अॅपलिकेशनमधील फोटो व व्हिडिओ दाखविले. फोटो पाहण्याच्या बहाण्याने त्याने दोघांचे मोबाईल पाहण्यासाठी स्वतःकडे घेतले. मोठ्या चलाखीने तो बाईकवर बसला आणि कल्याणीनगरच्या दिशेने धूम ठोकली.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे करीत आहेत.