हडपसर : रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील रस्त्यावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) पहाटे घडली आहे. अपघात घटनास्थळी दोन हेल्मेट मिळून आले मात्र इसम एकच होता. दुसरा व्यक्ती कोण होता त्याचे काय झाले याबाबत पोलिसांना दोन दिवस उलटून ही माहिती मिळू शकली नाही.
ईश्वर कुमार राजेंद्र कुमार पूनिया (वय- २८ रा. देहुगाव, मूळ रा. शेगाव जि. बुलढाणा) असे खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार. पीएमआरडीएकडून मांजरी-वाघोली रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम केले जात आहे. मांजरी शिवाजी पुतळापासून नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, दहा फूट खोल खड्ड्यामध्ये गंभीर जखमी अवस्थेत एक तरुण पडलेला नागरिकांनी पहिला, पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णाला दाखल केले.
दरम्यान, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवारची रात्र व शनिवारी पहाटेपर्यंत या दरम्यान तरुण दुचाकीवरून जात असताना खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा. घटनास्थळी दोन हेल्मेट मिळाले असून. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. याबाबत अद्याप पोलिसांना जबाब मिळाला नसून याबाबत तपास हडपसर पोलीस करीत आहे.
याबाबत आपचे नेते राजेंद्र साळवे म्हणाले, “मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंत पीएमआरडीए कडून सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे हे काम वाहनचालकांना अपघात ठरत असून रोज त्या ठिकाणी अपघात होत असून ठेकेदार व अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. शनिवारी झालेल्या अपघात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे काम करणारे ठेकेदार व पीएमआरडीएच्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.”