लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी, ता. ६ : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरपालिका विकास योजनेतील दलित वस्ती अंतर्गत भीमनगर येथील प्रस्तावित रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे कामातील रस्त्यामधील अतिक्रमण व अडथळे स्वतः उभे राहून कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने हटवले.
अतिक्रमण विरोधी पथक दक्ष
भीमनगर येथील दलितवस्तीतील रस्त्यामध्ये अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने काढून टाकली. पालिकेच्या जागेत शहरात विविध ठिकाणी केलेली अतिक्रमणे काढून टाकण्याचा सपाटा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी लावला आहे.
भिमनगर येथे रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. याची दखल घेऊन मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास रस्त्यावरील अडथळे दूर केले.
या कारवाईत पालिकेचे कर्मचारी रविंद्र कांबळे, सुर्यकांत कासुर्डे, अफजल डांगे, बाबू झाडे, सागर बगाडे, नाशीर शेख यांनी भाग घेतला.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, नागरिकांना नगरपरिषदेच्या मिळकती मधील व रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा अडथळे तयार करू नयेत. शहरातील विविध भागात असे प्रकार होऊ नये. यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.