पुणे : आपल्या आहारात, जेवणात कडधान्यांचा समावेश असावा, असे तज्ज्ञांकडून अनेकदा सांगितले जाते. पण काहीजण ते पाळतात तर काही दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक आजारांना एकप्रकारे आमंत्रणच मिळत असते. अशी एक गोष्ट आहे जी आपण आहारात घेतो पण त्याच्या फायद्याविषयी अनेकांना माहिती नसेल. ती म्हणजे मटकी.
आहारात मटकीचा आवर्जून समावेश केला जातो. मटकी फक्त भाजी किंवा उसळ करण्यापुरतीच मर्यादित नाही. तर त्याचे शरीराला अनेक फायदेही होतात. मधुमेह असेल तर मोड आलेली मटकी खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. मटकीतील पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
याशिवाय, मटकी लोहचा स्रोत असल्याने अॅनिमियापासून संरक्षण मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच मलावरोध दूर होतो, सर्दी, पडसं, कफ या विकारात मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग करावा, त्याने आराम मिळतो.
मटकीमध्ये असणाऱ्या झिंक या घटकामुळे रोगप्रतिकराक शक्ती चांगली वाढते. त्यामुळे अनेक आजार शरीरापासून दूर जातात. मटकी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे महत्वाचे काम करते. म्हणून आपल्या आहारात मटकीचा नियमित समावेश असावा, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.