पुणे : जबरी चोरी करणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. या दोघांनी रिक्षाला दुचाकी आडवी घालून रिक्षाचालकाचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या.
अजय महेश देशमुख (वय 22 रा. रेल्वे पटरीजवळ, मांजरी, मूळ रा. लोहगाव, जि. उस्मानाबाद), आकाश बालाजी ढवळे (वय 23 रा. रेल्वे पटरीजवळ, मांजरी, मुळ रा. किल्लारी कार्ला, ता. औसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विशाल विनायक भंडारी (वय 30 रा. संभाजी चौक, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.
ही घटना बुधवारी (दि.23) रात्री आठच्या सुमारास केशवनगर येथील बाबा कल्याणी बंगल्याजवळील मोकळ्या मैदानाजवळ घडली होती. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. फिर्यादी हे सर्पमित्र असून, ते त्यांचे काम संपवून कल्याणी बंगला रोडने रिक्षातून घरी जात होते. त्यावेळी दोन अज्ञातांनी दुचाकी (एमएच 12 व्हीडी 1575) रिक्षाला आडवी लावून भंडारी यांच्या खिशातील 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाला दोनजण गुरुकृपा सोसायटी केशवनगर येथे आडोशाला थांबल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने त्या ठिकाणी जाऊन दोघांकडे चौकशी करुन त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याकडून फिर्यादी यांचा चोरलेला मोबाइल आढळून आला.
दुचाकी चोरीची असल्याचे समोर
पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. चौकशीदरम्यान दुचाकी देखील चोरीची असल्याचे समोर आले. आरोपींनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. गुन्हा घडल्यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक करुन जबरी चोरी आणि वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.