सागर घरत
Karmala News : करमाळा : मांगी (ता. करमाळा) येथे बिबट्याने विनोद बागल यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला आहे. बिबट्या दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून, जनावरे ठार मारत आहे. गेल्या ४ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या दरम्यानच्या २० दिवसांत बिबट्याने तब्बल १५ जनावरे फस्त केली आहेत. हा बिबट्या वन विभागाला चकवा देत आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बंदोबस्ताची मागणी
सध्या पावसाने उघडीप दिली असून, पाळीव प्राणी हिरव्या चाऱ्याच्या शोधात रानोमाळ भटकत आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गोठ्यातील जनावरांची संख्या वाढवली. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याने हा व्यवसाय देखील धोक्यात आला आहे. पीक नाही, पिकाला बाजारभाव नाही. मग प्रपंचाचा गाडा हाकायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मांगी पंचक्रोशीतील दक्षिण वडगाव, उत्तर वडगाव, पोथरे, कामोने, जातेगाव या शिवारामध्ये बिबट्याची प्रचंड दहशत आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकरी जीव मुठीत धरून शेतीची कामे करत आहेत. शेतात काम करण्यासाठी महिला मजूर घाबरत आहेत. (Karmala News) रात्री बाहेर पडायला सुद्धा नागरिक घाबरत आहेत. समस्त गावकऱ्यांकडून वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागातर्फे वारंवार पिंजरे लावूनही बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नाही. (Karmala News) दररोज तो आपली जागा बदलत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाळीव जनावरांवर हल्ला करत आहे. माणसांच्या जिवावर बेतण्यापूर्वी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे.
याबाबत बोलताना वन अधिकारी सुरेश कुरले म्हणाले की, बिबट्याला पकडण्यासाठी यापूर्वीही पिंजरे लावण्यात आले होते; परंतु अपयश आले होते. (Karmala News) आता वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Karmala News : वंजारवाडी येथे वृद्धाचा खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला करमाळा पोलिसांनी घेतले ताब्यात..
Karmala News : करमाळ्यातील ए टी एम वरती चोरट्यांचा डल्ला : बँकेची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर..