पुणे : भारत सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव` उपक्रमाअंतर्गत सुरू झालेले राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान भारतातील विद्यार्थ्यांमध्ये IP जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याचाच योग्य तो प्रचार व विचारमंथन करण्यासाठी पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (एआयएसएसएमएस) बुधवारी (ता.२३ ऑगस्ट) बौद्धिक संपदा आणि पेटेंट फॅसिलिटेशन विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
स्टार्टअप्ससाठी बौद्धिक संपदा आणि आयपी व्यवस्थापन या विषयावर NIPAM च्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे प्रकल्प संचालक डॉ. सुराज भोयर यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन दिले. कार्यशाळेला प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
या वेळी बोलताना डॉ. सुराज भोयर म्हणाले की, IPR वर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना आणि सर्जनशीलतेला चालना देणे हा आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कार्यशाला सातत्याने आयोजित करण्यात याव्यात, अशी माझी इच्छा आहे. या प्रकारच्या कार्यशाळांचा जास्तीत जास्त विद्यार्थी चांगला लाभ घेतील व देशात नाविन्य आणि उद्योजकतेची संस्कृती निर्माण करतील.
बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व आणि स्टार्टअप पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट आणि इतर प्रकारच्या बौद्धिक संपदा अधिकारांद्वारे त्यांचे नवकल्पना, निर्मिती आणि कल्पना कशा संरक्षित करू शकतात याबद्दल या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांनी आयपी व्यवस्थापन, परवाना आणि व्यापारीकरणाच्या मूलभूत गोष्टी जाणून घेतल्या. जवळपास १५० हून अधिक विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
दरम्यान, संस्थेचे सचिव मालोजीराजे भोसले, सहसचिव सुरेश प्रताप शिंदे व खजीनदार अजय उत्तमराव पाटील यांनी या राष्ट्रीय कार्यशाळेला शुभेच्छा देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. एस. बोरमाने, विभागप्रमुख डाॅ. एस. व्ही. चैतन्य, फॅकल्टी को-ऑर्डिनेटर डाॅ. प्रिया गज्जल तथा डाॅ. एम. आर. डहाके उपस्थित होते. कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी एआयएसएसएमएसचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.