पुणे : ज्येष्ठ समाजसेवक, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॅा. प्रकाश आमटे यांना आज (शनिवारी) 45 दिवसांच्या उपचारांनंतर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. जून महिन्यात आधी न्युमोनिया आणि नंतर रक्ताच्या कर्करोगाचं निदान झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल होते.
प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत याने एक फेसबूक पोस्ट शेअर त्यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. सोबतच डॉक्टरांचे आभार मानले आहेत. प्रकाश आमटे यांना Hairy cell leukemia हा रक्ताचा कर्करोग झाला होता. आता ते त्यामधून मुक्त झाले आहेत. नागपूरात ते परतणार असले तरीही त्यांना फार लोकांना भेटण्याची मुभा नसेल असेही सांगण्यात आले आहे.
त्यांना केमोथेरपीनंतर घरी जाण्याची मुभा दिली आहे. काही दिवस प्रकाश आमटे हे नागपूर जवळील अशोकवन प्रकल्पात आराम करतील असे अनिकेत यांनी सांगितले आहे.
आपले वडील बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वसा प्रकाश आमटे हे चालवत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात लोक बिरादरी प्रकल्पात जवळपास 40 वर्षांपासून ते आदिवासी लोकांसाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. या लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून नर्सरी ते इंग्लिश मीडियमपर्यंत शाळा, शासकीय आश्रम शाळा, अनेक गरजवंताना मोफत आरोग्य सेवा देत आहेत.