लोणी काळभोर, (पुणे) : अवैधरीत्या कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करून गोवंश संरक्षण दलाच्या तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे १० जर्शा गायींची सुटका केली आहे. तर जनावरे घेऊन निघालेल्या चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अक्षय राजेंद्र कांचन (वय – २५ रा. महादेव नगर, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक सोमनाथ शेंडगे (वय- ४२, रा. कवडीपाट टोलनाका, मांजरी फार्म, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कांचन हे शेती व्यवसाय करीत असून गोरक्षादल महाराष्ट्र राज्य या गोवंश संरक्षण दला मार्फतीने गोरक्षक म्हणुन काम करतात. शुक्रवारी (ता. १८) संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मानद पशुकल्याण अधि. राहुल कदम यांनी फोनवरून माहिती दिली कि, एका आयशर टेम्पोमधून शेंडगे नावाचा इसम हा १० गायी भरून दौंडच्या दिशेने निघाला आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने हृषीकेश कामठे, प्रकाश खोले, आकाश भैसडे हे उरुळी कांचन चौकात थांबले असताना सदरचा टेम्पो हा दिसून आला. यावेळी टेम्पो बाजूला घेऊन त्या चालकाला नाव व पत्ता विचारले असता त्याने वरीलप्रमाणे नाव व पत्ता सांगितले. त्याच्याकडे सदरची जनावरे कोठे घेऊन जात आहे याची माहिती विचारली असता त्याने याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. सदर जनावरांना टेम्पोच्या मागील हौदामध्ये चारा- पाणी, इ. ची सोय दिसुन आली नाही.
दरम्यान, दोरीने जखडून अत्यंत निर्दयपणे, बेकायदेशीरपणे कत्तल करण्याचे उद्देशाने घेऊन जात असताना मिळुन आला म्हणुन अक्षय कांचन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो व ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० गायी असा ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.