पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यावर दोन बोगदे व दोन व्हायाडक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम जोरात सुरु आहे. हा बोगदा एकूण नऊ किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी आतापर्यंत सात किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
या बोगद्याची रुंदी २३.५ मीटर इतकी आहे. या मीसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे या शहरांतील अंतर कमी करणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली येथील बोगद्याचे काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाले.
या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार येथे नेहमीच होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या राहिलेल्या ‘मीसिंग लिंक’मुळे मुंबईला लवकर पोचणे शक्य होणार आहे.