Pimpri Chinchwad News : पुणे : संकटसमयी दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून जास्तीत जास्त वजन वाहून नेणे, बचाव पथकाला आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय साहित्य वाहून नेण्यासाठी मदत करणे, संरक्षण विभागात दुर्गम ठिकाणी सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांना वेळेत मदत पोहोचवणे… ही आव्हानात्मक कामे आता अधिक सुलभ आणि कमी वेळेत होणार आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा ड्रोन बनवलाय. चार किलो वजनाचा हा ड्रोन ८ ते १२ किलोपर्यंत वजन सहज उचलू शकतो. यामुळे आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत मदत पोहोचण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. (Pimpri Chinchwad News)
आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत मदत पोहोचण्याचा मार्ग सुलभ
इर्शाळवाडी गावामध्ये नुकतीच दुर्घटना घडली होती. संपूर्ण इर्शाळवाडी गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. हे गाव दुर्गम ठिकाणी वसलेले असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे आले. या भागात वेळेत औषधे तसेच इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला. तसेच संरक्षण विभागातील जवानही अशाच दुर्गम ठिकाणी सीमेवर कार्यरत असतात. त्यांना मदत मिळणे गरजेचे असते. अशा ठिकाणी मदत पोहचवण्यासाठी उपयुक्त ड्रोन विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा ड्रोन बनवलाय. (Pimpri Chinchwad News)
चेन्नई येथे ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर इंडिया’ साउथर्न सेक्शन ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज (साईस्) या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) मॅव्हरिक विद्यार्थी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा उद्देश कमी वजनाचा ड्रोन बनवणे हा होतो. हा ड्रोन जास्तीत जास्त वजन नेण्यासाठी सक्षम हवा होता. संकटसमयी वैद्यकीय साहित्य वाहून नेणे आणि संरक्षण दलास उपयुक्त ठरणे असा उद्देश या ड्रोनचा हवा होता. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धेत ८१ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघाला रोख रुपयांचे बक्षीस मिळाले. (Pimpri Chinchwad News)
या टीममध्ये मिहीर झांबरे, अनिकेत पिंगळे, रिफा अन्सारी, पार्थ देशमुख, अपूर्वा परदेशी, ओम बाजपेयी, रोहन गायकवाड, साक्षी कुडके, वैष्णवी खिलारी, ओम दुर्गे, रोहित तांबडे, सुजय अंबाडकर, प्रणाली मगदूम, खुशी ठोके, तन्मय राजपूत, तृप्ती बावनकर, वेदांत भारसाकळे, आदित्य पाटील, शर्वरी साळोख, महेश्वर ढोणे यांचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रा. चंदन इंगोले यांनी मार्गदर्शन केले.