Loni Kalbhor News पुणे : पूर्व हवेलीसह पुणे शहरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदऱ्याकडे जाणाऱ्या रामदरा ते लोणी काळभोर या सात किलोमीटर दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी निर्माण झाली आहे. (Loni Kalbhor News)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी या रस्त्याच्या कामासाठी सुमारे चार कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची घोषणा झाली असली तरी, प्रत्यक्षात मात्र एक छदामही खाली आली नाही. त्यामुळे रामदरा ते लोणी काळभोर या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था चंद्रावरील खड्ड्यांनाही लाजवेल, अशी झाली आहे. (Loni Kalbhor News)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत तीर्थक्षेत्र रामदरा रस्ता मंजूर झाल्याची बातमी आल्यानंतर, श्रेयवादासाठी सोशल मीडियामधून ‘वॉर’ छेडणारे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे योद्धे आळीमीळी गुपचिळी अशी भूमिका घेऊन गप्प झाले आहेत. तीर्थक्षेत्र रामदरा पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पुणे शहर व आसपासचे लाखो भाविक रामदऱ्याला भेट देण्यासाठी येतात. पावसाळी धुके, रिमझिम पाऊस आणि थंडगार वाऱ्यात विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी व धार्मिक पर्यटन करण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत. कोरोना काळात लागलेले लॉकडाऊन संपल्यापासून, तीर्थक्षेत्र रामदरा येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. (Loni Kalbhor News)
पुणे शहर व परिसरातील नागरिकांना धार्मिक, नैसर्गिक पर्यटन करण्यासाठी व हौशी तरुणांना ट्रेकिंगचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी असलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगातील डोंगर यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. सध्या चालू असलेल्या पावसामुळे डोंगर पूर्णपणे हिरवागार झाला असून, एखाद्या नववधूने हिरवा शालू नेसल्यासारखा सुंदर दिसत आहे. मात्र, या ठिकाणी येणारा भाविक रामदऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाऊल टाकताच, ‘येऊन चूक तर नाही केली’ असे म्हणत प्रवास सुरु करतो. रामदरा परिसरातील वातावरण पाहून ताजेतवाना झालेला भाविक असो किंवा पर्यटक रस्त्यावरील खड्ड्यामुळे पुन्हा न येण्याचे ठरवूनच पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघतो.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे…
लोणी काळभोर गावातून रामदऱ्याकडे जाणारा रस्ता थोडा अरुंद असून, या रस्त्यावर मागील काही महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे पाहून या रस्त्यावरुन प्रवास करताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पुणे शहर व आसपासच्या गावातून प्रतिदिन हजारो भाविक रामदऱ्यात येत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी रामदऱ्यात फिरकला नसल्याची बाब पुढे आली आहे. या रस्त्यावरील वाहतूक पाहता हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कालव्यावरील ५८ वर्षांच्या पुलाचे ढासळलंय बांधकाम
लोणी काळभोरहून तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाण्यासाठी शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या नवा मुठा उजवा कालवा ओलांडून जावे लागते. सिद्राममळा परिसरातील कालव्यावरील पूल हा १९६५ साली म्हणजेच ५८ वर्षांपूर्वी बांधला गेलेला आहे. कालव्यावरील ५८ वर्षांच्या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. हा पूल कुमकुवत झाला आहे. या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. हा पूल कधीही पडू शकतो. तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणाऱ्या पाच हजार भाविकांना याच पूलावरून जावे लागते. कालव्यावरील पूल नवीन बांधावा यासाठी लोणी काळभोरचे सरपंच, उपसरपंच व स्थानिक राजकीय नेत्यांनी शासन दरबारी वारंवार विनंती करुनही, शासन पूल उभारणीसाठी तयार होत नसल्याचे दिसून आले आहे.
मोठी दुर्घटना झाल्यावरच पुलाची उभारणी?
रामदरा रस्त्यावरील वाढती प्रवाशी संख्या लक्षात घेऊन तीस वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र रामदऱ्याकडे रस्त्यातील पुणे-कोल्हापूर या लोहमार्गावर पूल बांधावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी केली होती. परंतु, तत्कालीन प्रशासनाने या मागणीला ‘वाटाण्याच्या अक्षता’ लावल्या जात होत्या. तीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९९१ साली पुण्यातील शिवाजीनगर येथील नाथ हरी पुरंदरे विद्यालयाच्या सहलीची बस व रेल्वे यांचा अपघात झाला. या अपघातात शिक्षक, मुले, मुली यांच्यासह ३८ जण मृत्यूमुखी पडले. हा अपघात इतका भीषण होता की, तत्कालीन रेल्वेमंत्री सी. के. जाफर शरीफ हे दिल्लीहून घटनास्थळाला भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. नंतर लोहमार्गावर तातडीने पूल बांधण्यात आला. अशी एखादी दुर्घटना घडल्यावर, कालव्यावर पूल बांधला जाणार का? असा प्रश्न सध्या स्थानिकांकडून विचारला जात आहे.
पुढारी, नेते, ‘सब घोडे बारा टक्के’
लोणी काळभोर हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजले जाते. येथे डझनभर पक्षांचे दोन चार डझन राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील नेते, पदाधिकारी आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो, कोटी रुपयांची विकासकामे आम्ही, आमच्या खासदार, आमदार व आमच्या पक्षाने केल्याची जाहिरात करणारे पदाधिकारी आहेत. त्यांच्या सोशल मीडियातील पोस्टला ‘जी.जी..रं…जी..जी’ करणारे शेकडो कार्यकर्ते आहेत. संसदरत्न पुरस्कार मिळवणारे खासदार व स्वयंघोषित कार्यसम्राट आमदारही आहेत. वर्षापूर्वी आमच्याच पक्षाने रामदरा रस्त्यावर ४ कोटी रुपये निधी टाकला म्हणून सोशल मीडियात दुसऱ्या पक्षातील लोकांशी ‘सोशल वॉर’ खेळणारे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते ‘छे-छे’ योद्धे आहेत. तरीही तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावर मुरमाचा खडा किंवा डांबराचा ठिपका का पडला नाही? हे सर्वसामान्य जनतेला पडलेले फार मोठे कोडे आहे. या कोड्याचे उत्तर देणारा कुणी आहे का या जगात?, असाच प्रश्न सध्यातरी समोर उभा आहे.