Pune News पुणे : शहरातील वाहनांच्या संख्येत गेल्यावर्षी अडीच लाखांनी, तर चार वर्षांत आठ लाखांनी वाढ झाल्याची आकडेवारी सर्वांनाच ज्ञात आहे. दरम्यान, सध्या वाहनखरेदीचा वेग वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना काळाच्या तुलनेत गेल्यावर्षी वाहनांची विक्री वाढली असून, सध्या पुणे शहरात एकूण ३५ लाख ९४ हजार १३२ वाहने आहेत. त्यापैकी दोन लाख ५५ हजार ७५७ वाहनांची गेल्या वर्षी भर पडली आहे. (Pune News)
‘पर्यावरण सद्यस्थिती २०२२-२३ अहवाल’ महापालिकेने प्रसिद्ध केला. त्यामध्ये शहरात २०२२ अखेरपर्यंत ३५ लाख ९४ हजार वाहने होती. कोरोना काळात मंदावलेला वाहनखरेदीचा वेग २०२१ मध्ये वाढला. यंदा आतापर्यंत एक लाख ६९ हजार ५५२ वाहनांची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी (२०२२) दोन लाख ५५ हजार ७५७ वाहनांची खरेदी झाली होती. वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. (Pune News)
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या ४५८ ‘ई-बस’ आहेत. या बसचा डिसेंबर २०२२ अखेर ३.५० कोटी किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास झाला आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यातील १,४२१ बस ‘सीएनजी’वरील आहेत.
गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग ताशी १८ किलोमीटर आहे. सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण १९ टक्के असून, शहरातील नागरिकांचे सरासरी प्रवासाचे अंतर आठ किलोमीटर आहे. शहरात २०१९ या वर्षी दोन लाख ३९ हजार ६६० वाहनांची विक्री झाली. २०२० या वर्षी एक लाख ४९ हजार २३५ वाहनांची विक्री झाली. २०२१ या वर्षी १ लाख ६९ हजार ५५२ वाहनांची विक्री झाली, तर २०२२ या वर्षी २ लाख ५५ हजार ७५७ वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे.